ब्रिटिशांचे 'डग बिगन' पुढे मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान कसे झाले?

'वर्षा बंगला' हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान मानले जाते.
फोटो कॅप्शन, 'वर्षा बंगला' हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान मानले जाते.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

जेव्हा जेव्हा राज्यात सत्ता बदल होतो, सरकार स्थापनेचा विषय येतो वा मुख्यमंत्रिपदाचा विषय येतो, त्यावेळेला 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान विशेष चर्चेत येतं.

आता 15 व्या विधानसभेचं नवं सरकार स्थापन झालं आहे. नवे मुख्यमंत्री लवकरच वर्षा निवासस्थानी वास्तव्यासाठी जातील. त्यामुळे, पुन्हा एकदा 'वर्षा' या शासकीय बंगल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकतेच महाराष्ट्रात महायुतीचे नवं सरकार स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली; तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. परंपरेनुसार आता शासकीय निवासस्थानेदेखील बदलतील.

मागील अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांचं वास्तव्य होतं.

आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं आहे. त्यामुळे, त्यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणून वर्षा निवासस्थान हे आता देवेंद्र फडणवीस यांना मिळेल. याच वर्षा बंगल्याला परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून एक वेगळा असा वारसा आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला हा पूर्वी मात्र मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान नव्हते. तसेच या शासकीय बंगल्याचं नावदेखील 'वर्षा' असे नव्हते. पण कालांतराने हा बंगला मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला झाला.

या शासकीय बंगल्याला 'वर्षा' नाव पडण्याला एक जुना इतिहास आहे.

मलबार हिलच्या देखण्या वास्तूंमध्ये 'वर्षा'चे महत्त्व वेगळे

इंग्रजांच्या काळात मलबार हिल परिसरात गेल्या शतकात अनेक देखण्या वास्तू उभ्या राहिल्या. त्यात प्रामुख्याने गव्हर्नर, वरिष्ठ इंग्रज अंमलदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक यांचे प्रमुख; तसेच मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वे विभागांचे सरव्यवस्थापक यांच्या अधिकृत निवासस्थानाचा समावेश होतो.

त्याप्रमाणेच, अनेक धनवंतांनीही हा हिरवागार परिसर राहण्यासाठी पसंत केला. याच परिसरात एका बाजूला राजभवन तर दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' हा बंगलादेखील आहे.

वर्षा बंगल्याच्या बाजूलाच कधीकाळी मोहम्मद अली जिना यांचा असलेला 'जिना हाउस' हा ऐतिहासिक बंगलादेखील आहे.

या परिसरात हाय प्रोफाईल लोकदेखील मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र, तरीही मलबार हिलच्या या भागात चर्चेच्या केंद्रस्थानी असतं ते म्हणजे 'वर्षा' निवासस्थानचं.

याच वर्षा बंगल्यासंदर्भात प्रसिद्ध साहित्यिक 'मधु मंगेश कर्णिक, दूत पर्जन्याचा, वसंतराव नाईक, कृषिसंशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुंबई, 1994, लोकराज्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, डिसेंबर 2012' मध्ये माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार, 'दूत पर्जंन्याचा' या चरित्रातील एक लेख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं स्थान महत्त्व अधोरेखित करतो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी हे चरित्र लिहिलं आहे. ते मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहत असत. कर्णिक यांनी 'दूत पर्जन्याचा'द्वारे नाईक यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. त्यातच वर्षा बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं.

मधु मंगेश कार्णिक लिहितात, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता. ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत या बंगल्याचं नावही वर्षा नव्हतं. नाईक कृषिमंत्री झाले आणि त्यांच्या वाट्याला मंत्री म्हणून 'डग बिगन' नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. जो बंगला सरकारनं दिला, तो त्यांनी स्वीकारला.

वसंतराव नाईक मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही नीटनेटकं राहण्याची आवड होती. तसा हा 'डग बिगन' बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही.

वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं, "सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना? शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य! त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा नेकलेस ऑफ बाँम्बे क्वीन कसा रात्री झगमगतांना दिसतो. चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळतांना दिसतात. त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत. त्याची बाग किती सुरेख आहे! त्या मानानं डग बिगन अगदीच साधा आहे."

यावर नाईक म्हणाले, "छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे. ते खरंच होतं. वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यागताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती. त्याला घराचा मोकळेपणा होता."

'डग बिगन'चं असं झालं 'वर्षा' असं नामांतर...

नाईक यांचा मुलगा अविनाश यांच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब 'डग बिगन'वर राहायला आले होते. नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची 'शेतकऱ्यांचे गाणे' ही अत्यंत आवडीची कविता होती.

त्यामुळे आल्या दिवशीच नाईक यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं. त्यांनी 'वर्षा'च्या आवारात आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते बागकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याला म्हणायचे, "मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत."

मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते.

ते म्हणाले, "शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळणार असं दिसतं."

एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.
फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

"होय, बाबासाहेब! छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहयला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस (फक्त गेलं वर्ष वगळता) सुखाचे गेले," नाईक यांनी स्पष्ट केलं.

त्यावेळी दोघा भावांच्या संभाषणात वत्सलाबाईदेखील सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, "आता तर आम्ही इथं रूळलोच आहोत. आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको! आपण इथं खूष आहोत."

वसंत, वत्सला आणि वर्षा ही तिन्ही नावे 'व' या अक्षरानं सुरू झालेली नावं आहेत. खरंच वर्षा बंगला आपल्याला भाग्याचा ठरेल? याचं बंगल्यात आपलं गेलं वर्ष फक्त वाईट गेलं ते 1962 चं साल. त्याच वर्षी आपली एकुलती एक लाडकी बेबी आपल्याला सोडून गेली, हे विचारही वत्सलाबाईंच्या मनात डोकावून गेले.

वत्सलाबाईंच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायचं होतं; पण नाईक यांचा सौम्य विरोध होता. ते म्हणतं, आपण काय आज मंत्री आहोत. उद्या कदाचित नसू ,आपल्या खातर सरकारवर खर्चाचा बोजा नको हा नाईक आणि कुटुंबीयांमधला संवाद कर्णिक यांनी आपल्या लिखाणात नोंदवला आहे.

वर्षावर आले होते पंडित जवाहरलाल नेहरू...

पंडित जवाहरलाल नेहरू 1964 मध्ये मुंबईत राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. नाईक यांनी पंडितजी आणि विजयालक्ष्मी यांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं. ते त्यांनी स्वीकारलं होतं. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर डिनरची व्यवस्था करण्यात आली होती, असाही उल्लेख 'दूत पर्जन्याचा'मध्ये आहे.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलवलं; परंतु वसंताच्या हृदयातला 'वर्षाऋतू' कायम होता. शेतात राबणाऱ्या कास्तकारांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला.

त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलवला आणि पुसद गाठलं; पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षाचं स्थानमाहात्म्य कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे असं 'दूत पर्जन्याचा'मध्ये याचा आवर्जून उल्लेख आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना महासाथीसंदर्भात 'वर्षा' बंगल्यावर घेतलेल्या बैठकीचे छायाचित्र
फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना महासाथीसंदर्भात 'वर्षा' बंगल्यावर घेतलेल्या बैठकीचे छायाचित्र

पूर्वी सह्याद्री अतिथी गृह हेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होतं!

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते पी. के. सावंत हे मुख्यमंत्री म्हणून सह्याद्री अतिथी गृह येथील बंगल्यावरच वास्तव्यासाठी होते.

1995 नंतर वसंतराव नाईक यांच्यानंतरचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपला निवास पुन्हा 'सह्याद्री'वर नेला. त्यानंतर वर्षा बंगल्यात न राहिलेले एकमेव मुख्यमंत्री बनले ते शरद पवार! त्यांनी 'रामटेक' हा प्रशस्त बंगला मंत्री म्हणून पसंत केला होता.

1978 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी आपला मुक्काम तिथेच कायम ठेवला. याच बंगल्यात 'सिंहासन' या गाजलेल्या चित्रपटाचे काही चित्रीकरणही झाले होते.

"अर्थात, त्यानंतर शरद पवार आणखी तीन वेळा मुख्यमंत्री झाले आणि त्या प्रत्येक वेळी त्यांनी वर्षा बंगल्यावर आपला निवास ठेवला," असे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात.

देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याआधी मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर घेतलेले त्यांचे छायाचित्र.
फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याआधी मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर घेतलेले त्यांचे छायाचित्र.

यानंतरही वर्षा बंगला सतत चर्चेत राहिला आहे. शरद पवार यांच्याप्रमाणे वसंतदादा पाटील चार वेळा मुख्यमंत्री झाले; पण दोघे एकदाही आपला अवधी पूर्ण करू शकले नाहीत.

काँग्रेस पक्षाने 1978 आणि 1985 अशा दोन निवडणुका जिंकल्यावर वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि लवकरच त्यांना पायउतारही व्हावे लागले. पक्षातून बाहेर पडलेले पवार 1986 मध्ये स्वगृही परतले.

त्यांच्या नेतृत्वाखाली 1990 ची निवडणूक जिंकून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला; पण ते दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि 'वर्षा'वर परतले 1993 मध्ये सुधाकरराव नाईक यांना दूर करण्यात आल्यानंतर. पवार यांच्यानंतर 1980 मध्ये अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले आणि तेही वर्षावर वास्तव्यासाठी आले.

आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री

1. यशवंतराव चव्हाण - 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962

2. मारोतवार कन्नमवार - 20 नोव्हे. 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. पी. के. सावंत - 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963

4. वसंतराव नाईक 5 डिसें. 1963 ते 21 फेब्रु. 1975

5. शंकरराव चव्हाण - 21 फेब्रुवारी 1975 ते 17 मे 1977

6. वसंतदादा पाटील - 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978

7. शरद पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

राष्ट्रपती राजवट - 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980

8. ए. आर. अंतुले 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982

9. बाबासाहेब भोसले - 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983

10. वसंतदादा पाटील - 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985

11. शिवाजीराव पाटील निलंगेकर - 3 जून 1985 ते 12 मार्च 1986

12. शंकरराव चव्हाण - 12 मार्च 1986 ते 26 जून 1988

13. शरद पवार - 26 जून 1988 ते 25 जून 1991

वर्षा निवासस्थानाबाहेर असलेला पोलिसांचा फौजफाटा
फोटो कॅप्शन, वर्षा निवासस्थानाबाहेर असलेला पोलिसांचा फौजफाटा

14. सुधाकरराव नाईक - 25 जून 1991 ते 6 मार्च 1993

15. शरद पवार - 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995

16. मनोहर जोशी - 14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवारी 1999

17. नारायण राणे - 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999

18 विलासराव देशमुख - 18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

19. सुशीलकुमार शिंदे - 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004

20. अशोक चव्हाण - 8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010

21. पृथ्वीराज चव्हाण - 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014

राष्ट्रपती राजवट - 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014

22. देवेंद्र फडणवीस - 31 ऑक्टोबर 2014 ते 2 नोव्हेंबर 2019

राष्ट्रपती राजवट 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019

23. देवेंद्र फडणवीस - 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019

24. उद्धव ठाकरे - 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022

25. एकनाथ शिंदे - 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024

26. देवेंद्र फडणवीस - 5 जून 2024 पासून सरकार असेल तोपर्यंत

'वर्षा'निवासी नेत्याच्या कारकिर्दीचे काही ना काही वैशिष्ट्य

वसंतदादा, शरद पवार आणि ए. आर. अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आताचे उद्धव ठाकरे अशा प्रत्येक 'वर्षा'निवासी नेत्याच्या कारकीर्दीचे काही ना काही वैशिष्ट्य राहिले आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे वसंतराव नाईक आणि फडणवीस असे दोघेच 'वर्षा'मध्ये पूर्ण पाच वर्षे राहू शकले आहेत; मात्र नाईक एक तप, तर त्यांच्या खालोखाल म्हणजे सुमारे साडेसात वर्षे विलासराव आणि सर्वांत कमी काळ म्हणजे जेमतेम आठ महिने नारायण राणे 'वर्षा'मधील वास्तव्य उपभोगू शकले.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आल्यावर वर्षा बंगल्यावर झालेला जल्लोष!
फोटो कॅप्शन, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आल्यावर वर्षा बंगल्यावर झालेला जल्लोष!

वसंतदादा, सुधाकरराव आणि सुशीलकुमार हे तिघे मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर राज्यपाल बनले, तर यशवंतराव आणि शंकरराव चव्हाण, जोशी, सुशीलकुमार आणि विलासराव आधी मुख्यमंत्री; नंतर केंद्रीय मंत्री बनले.

चव्हाण आडनावाचे तीन मुख्यमंत्री या पदावर दोनदा आले; पण हे भाग्य पृथ्वीराज यांना लाभले नाही. 'वर्षा'बरोबर निगडित अशा अनेक कथा आणि अख्यायिका आहेत, असे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात.

अंतुलेंनी केला वर्षा बंगल्याचा कायापालट

1980 मध्ये अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वर्षा बंगल्याचा कायापालट केला. हा बंगला एक मजली होता आणि साधा होता. तसेच अनेकवेळा मुख्यमंत्री गाठीभेटी बंगल्यातच घेत असत, यामुळे घरातील इतरांना तसेच स्त्रियांना पाहुण्यांसमोर ये-जा करणे संकोचाचे वाटायचे.

त्यामुळे अंतुले यांनी बंगल्यावर आणखी एक मजला बांधला आणि तिथे दोन शयनगृह तयार केले. याच सोबत वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक आच्छादित मार्ग उभारायचं ही ठरवलं होतं असं ही राही भिडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)