आयर्लंडचे रस्ते कोकणातले दाखवण्याऱ्या पोस्टरमुळे शिवसेना ट्रोल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twiter
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कोकणात शिवसेनेच्या पोस्टरवर आयर्लंडचे रस्ते
शिवसेनेचे खासदार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या पोस्टरवर चक्क आयर्लंडचे रस्ते दाखवले आहेत. या पोस्टरमुळे राऊत आणि पर्यायाने शिवसेना ट्रोल होत आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दाखवली आहे.
खासदार म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्गात हे रस्ते बनवल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र नेटिझन्सनी या रस्त्याचं सत्य बाहेर काढलं आहे. हे रस्ते आयर्लंडचे असल्याचं नेटिझन्सनी सांगितलं आणि त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाही राऊत यांनी पोस्टरबाजीतून विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रगत कोकण शांत कोकण ही टॅगलाईन देत राऊत यांनी त्यांच्या पोस्टरवर सुसज्ज आणि भव्यदिव्य रस्ते दाखवले आहेत. खासदार म्हणून कोकणात मी हे रस्ते बनवले आहेत असा दावा त्यांनी केला.
तरुण मतदारांनी पोस्टरवरील हे रस्ते नेमके कोणत्या देशातील आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हे रस्ते आयर्लंडमधील विकोलो शहरातील असल्याचं आढळून आलं आहे.
प्रसारमाध्यमांनी राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. जे काम शिवसेनेनं केलं आहे त्याकडे लक्ष द्या, सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेऊ नका असं त्यांनी सांगितलं.
2. नमो टीव्हीवर अखेर बंदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पीएम नरेंद्र मोदी चरित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक काळात करण्यास निवडणूक आयोगाने बुधवारी बंदी घातली.
राजकीय नेता किंवा व्यक्ती जनमानसावर परिणाम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात दाखवू नये या आचारसंहितेतील नियमाचा चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे भंग होत असल्याचे आयोगाने म्हटलं आहे. याबरोबरच नमो टीव्हीचं प्रसारणही रोखण्यात आलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
आयोगाने मोदी यांच्यावरील चित्रपटाला निवडणूक काळात प्रदर्शनावर घातलेली बंदी नमो टीव्हीलाही लागू असल्याचं स्पष्ट केलं आहे. नमो टीव्हीचं प्रसारण निवडणूक काळात करता येणार नाही, असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. नमो टीव्हीवरून पंतप्रधानाची भाषणं आणि आणि कार्यक्रम प्रसारित केले जातात.
3. 600 मोदी विरोधक कलाकारांविरोधात 900 मोदीसमर्थक कलाकार एकवटले
देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतर 900 कलाकारांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींचं समर्थन केलं आहे. 'आज तक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
या कलाकारांनी देशातील नागरिकांना भारतीय जनता पक्षालाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. मोदीसमर्थक कलाकारांमध्ये गायक संगीतकार शंकर महादेवन, नाट्यकर्मी वामन केंद्रे, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह साधारण 900 कलाकारांचा समावेश आहे.
4. अल्पेश ठाकोरचा काँग्रेसला रामराम
गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी गुजरातच्या अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. ठाकोर हे काँग्रेसच्याच तिकीटावर आमदार झाले होते. अल्पेश यांना लोकसभा निवडणुकीला लढवायची होती. त्यांनी काँग्रेसकडे साबरकांठा जागेसाठी मागणी केली होती. परंतु काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
5. जेट एअरवेज खरेदी करण्यास चार कंपन्या उत्सुक
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला विकत घेण्यासाठी टीपीजी कॅपिटल, इंडिगो पार्टनर्स, नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड, एतिहाद एअरवेज या कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
'लाईव्हमिंट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. जेटमधील समभाग विकत घेण्यासाठीची डेडलाईन शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. एअर कॅनडा आणि डेल्टा एअरलाईन्स या कंपन्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























