IPL 2019 - DC vs RCB: विराट कोहली अपयशी, पण बंगळुरूचा अखेरच्या सामन्यात विजय

फोटो स्रोत, Getty Images
IPL 2019 मध्ये शनिवारी झालेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला. या हंगामात अनेक दारुण पराभवांना सामोरं जाणाऱ्या बंगळुरूचा हा शेवटचा सामना होता.
पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. या पराभवासह राजस्थान प्लेऑफ म्हणजे अंतिम चारच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
तर शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात हैदराबादसुद्धा पराभूत होऊन प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. आता स्पर्धेच्या अंतिम चार संघात पोहोचण्यासाठी त्यांचं नशीब दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. दुसऱ्या बाजूला बंगळुरूचा संघ आधीच प्लेऑफच्या बाहेर गेला आहे.
दिल्ली विरुद्ध राजस्थान
शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीने फिरोजशाह कोटला मैदानावर राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला.
राजस्थानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 115 धावा केल्या. रियान पराग वगळता कोणत्याही फलंदाजाचा दिल्लीच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. रियान परागने 50 धावा केल्या.
त्याशिवाय लियाम लिविंगस्टोनने 14 आणि श्रेयल गोपालने 12 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आमि संजू सॅमसन यांनी केवळ पाच धावा केल्या.
दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 38 धावात तीन, अमित मिश्राने 17 धावांत तीन गडी बाद केले.

फोटो स्रोत, Rajasthan Royals Twitter
दिल्लीसमोर विजयासाठी 116 धावांचं लक्ष्य होतं. ऋषभ पंतच्या नाबाद 53 धावांच्या बळावर 16.1 षटकांत त्यांनी हे लक्ष्य पूर्ण केलं.
ऋषभ पंतने 38 चेंडूत दोन चौकार आणि पाच छटकार लगावले. राजस्थानचा स्कोर इतका कमी होता की दिल्लीतर्फे फक्त ऋषभ पंतशिवाय कुणालाही फारसं काही करावं लागलं नाही.
हैदराबाद विरुद्ध बेंगळुरू
दुसऱ्या सामन्यात हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. त्यांनी 20 षटकांत 175 धावा केल्या.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने पाच चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 70 धावांची खेळी केली. विल्यमसन शिवाय सलामीचा फलंदाज रिद्धिमान साहा 20 आणि मार्टिन गप्टिल यांनी 30 धावा केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
विजय शंकर यांनी तीन षटरकारांसह 27 धावा केल्या. मात्र इतर फलंदाज फारसं योगदान देऊ शकले नाही. बंगळुरूच्या वॉशिंग्टन सुंदरने 24 धावा देऊन तीन आणि नवदीप सैनीने 39 धावा देऊन दोन गडी बाद केले.
बंगळुरूसमोर विजयासाठी 176 धावांचं लक्ष्य होतं. पण विराटचा संघ पुन्हा सुरुवातीलाच घसरला आणि वीस धावांत त्यांनी 3 विकेट गमावल्या होत्या. त्यात पार्थिव पटेल, कर्णधार विराट कोहली, आणि ए.बी.डिव्हिलियर्सचा समावेश होता.
पार्थिव पटेलने तर खातंही उघडलं नाही. विराट कोहली 16 तर डिव्हिलियर्सने अवघ्या 16 धावा केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
अखेर सिमरन हॅटमायर आणि गुरकीरत सिंह मानने संघाला तारलं. हॅटमायरने 75 आणि गुरकीरतने 65 धावा केल्या आणि त्यांच्यात 144 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी हैदराबादच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

फोटो स्रोत, Getty Images
बंगळुरूचा संघ जेव्हा विजयाच्या समीप होता तेव्हाच हॅटमायरच्या रूपात त्यांना चौथा झटका बसला. तेव्हा बंगळुरूच्या खात्यात 164 धावा होत्या. 167 धावा असताना पाचवा तर 168 धावांवर त्यांचा सहावा गडी बाद झाला. मात्र तेव्हापर्यंत विजयाचं पारडं बंगळुरूच्या बाजूने झुकलं होतं.
बंगळुरूने विजयासाठीचं लक्ष्य 19.2 षटकांत लक्ष्य पूर्ण केलं.
प्लेऑफची शर्यत
सध्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स 13 सामन्यात नऊ विजय आणि चांगल्या नेट रनरेटच्या आधारावर 18 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे.
शनिवारी दिल्ली आणि राजस्थान प्लेऑफ फेरीपूर्वीचा अंतिम सामना खेळत होते. शनिवारच्या विजयानंतर दिल्ली 14 सामन्यात नऊ विजय आणि 18 अंकासकट गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. तर राजस्थानच्या संघाने 14 सामन्यात 11 गुण प्राप्त केले आहेत. ते 6व्या स्थानी आहेत.
शनिवारच्या पराभवानंतर हैदराबादने 14 सामन्यात 6 विजयासह 12 गुण कमावले. ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रविवारी IPL मध्ये प्लेऑफच्या आधी अंतिम दोन सामने खेळले जातील.
पहिला सामना मोहालीत किंग्स इलेव्हनचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होईल. दुसरा सामना मुंबई आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. ही लढत वानखेडे स्टेडिअमवर होईल.
चेन्नई आणि मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जागा पटकावली आहे. कोलकाताच्या खात्यात 12 गुण आहेत. जर रविवारचा सामना जिंकला तर 14 अंकासकट प्लेऑफमध्ये स्थान पटकावेल.
कोलकाताचा पराभव झाला तर हैदराबादचा प्लेऑफमध्ये जाण्याचा निर्णय रनरेटच्या आधारावर होईल. पंजाब खराब रनरेटमुळे प्लेऑफच्या बाहेर होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























