कोरोना लॉकडाऊन शिथिल होताच नागपूर शहरात 5 खून का झालेत?

फोटो स्रोत, Ani
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नागपूरहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या काही दिवसांत नागपूरच्या वृत्तपत्रांमधल्या या काही बातम्या -
3 जून- काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या अनुज बघेल ठाकूरचा नागपूरच्या यशोधरानगर भागात रात्री खून करण्यात आला. तुरुंगात जाण्यापूर्वी त्याने एकाची गाडी जाळली होती, त्याची भरपाई मागितल्यावर ती देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्याला धारदार शस्त्राने ठार केलं.
4 जून - प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी बाईकस्वार कार्तिक साळवी (वय 24) याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
काही तासांच्या काळातच वैभव मूर्ते उर्फ मात्रे या तरुणाची हत्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली. तो बाईकवर असताना जुन्या वैमनस्यातून आरोपींनी आधी त्याच्यावर मिर्चीपूड फेकली आणि नंतर त्याला भोसकून आणि ठेचून ठार केलं.
एम्प्रेस मॉलजवळ गोलू नावाच्या छत्तीसगडच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला, एक हात, एक पाय कापलेला. दोघा जणांनी क्षुल्लक कारणावरून गोलूला मारल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं.
जून 7 - पार्डी बाजार मुख्य रस्त्यावर प्रदीप उर्फ बाल्या वंजारीचा खून करण्यात आला. महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणातून कुख्यात गुंड असलेल्या बाल्याचा आरोपीने काटा काढला, असं पोलिसांनी सांगितलं.
आधीच कोरोना व्हायरसच्या रोगाची भीती, त्यात लॉकडाऊनमुळे झालेलं आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रागा सोसून घरांमध्ये बसलेल्या नागपुरकरांना गेल्या काही दिवसांपासून पेपर वाचून आणखी टेन्शन येतंय.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

शहरात कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असतानाच जसजसा लॉकडाऊन शिथिल केला जातोय, तसतशी गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढतेय का? याची काय कारणं आहेत, याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्न.
उपराजधानी गुन्हेगारीची राजधानी?
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडेच होतं. त्यामुळे राज्यातील, विशेषतः नागपूरमधील गुन्हेगारीसाठी विरोधक त्यांच्यावर सातत्याने टीका करायचे, नागपूरला 'क्राईम कॅपिटल' म्हणायचे.
त्यामुळे गुन्हेगारांवर वचक मिळवण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आणि काही प्रमाणात त्यांना यशही आलं.
शहर पोलिसांचीच आकडेवारी सांगते की, 2019 मध्ये गुन्हे 2018च्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी झाले. मात्र चिंतेची बाब म्हणजे या दरम्यान खून वाढले. 2018 मध्ये 77 होते ते 2019 मध्ये 83 झाले.

फोटो स्रोत, Ani
खुनाचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि चोरी-दरोड्यासारखे इतर गुन्हे आजही घडतच असले तरी, खुनाच्या घटनांनी कायमच शहराला हादरवून सोडलं आहे आणि शहराबाहेरही त्याच्या हेडलाईन्स झाल्या आहेत... मग ते 2004चं अक्कू यादव लिंचिंग प्रकरण असो, 2011 मध्ये घडलेलं मोनिका किरणापुरे हत्याकांड असो, किंवा कुश कटारिया आणि युग चांडक सारख्या चिमुकल्यांचं अपहरण आणि खून असो.
गेल्या दशकभरात शहरातला रिअल इस्टेटचा व्यवसाय जोर पकडू लागल्यानंतर काही कट रचून केलेल्या खुनाच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. प्रॉपर्टी डीलर, व्यावसायिक आणि एजंट्सचे खून गेल्या पाच वर्षांत अनेक घडले.
पण नागपुरात मुंबईसारखं ऑर्गनाईज्ड क्राईम पाहायला मिळत नाही, इथे कुठलेही गँगवॉर नाहीत. फक्त काही लहानसहान टोळ्या आहेत, ज्या त्यांच्या त्यांच्या वस्त्यांमध्ये काम करतात. शहरातील गुन्हेगारीवर बराच काळ वार्तांकन केलेले पत्रकार जयदीप हर्डीकर सांगतात की नागपुरात ठरवून केलेल्या खुनाच्या घटनांपेक्षा रागाच्या भरात केलेले गुन्हेच सातत्याने आढळतात.
"रस्त्यात कुणाची कुणाशी बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली आणि एकाने चाकू काढून भोसकलं, अशाच घटना जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेकदा गुन्हेगार हा घटनास्थळीच सापडतो किंवा तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण करतो. अक्कू यादव याला ठेचून मारल्याची घटनाही रागाच्या भरातच जमावाच्या हातून घडली होती," ते सांगतात.
नागपुरातले लोक 'गरम' असतात, लवकर चिडतात, असं कायम बोललं जातं. तसे मीम्सही आजकाल येऊ लागलेत. या घटना खरंतर याच तापट स्वभावाची साक्ष देणाऱ्या आहेत.
"साधं पेट्रोल पंपावर गेलं की काहीशे रुपयांसाठी कुणाला मारून टाकणं, कुणी धमकी दिली, कुणी डोळे दाखवले, काही बोललं म्हणून जीवे मारून टाकायचं, ही प्रवृत्ती कायम राहिलीच आहे नागपूरची. आणि आता तर लोकांच्या हातून रोजगार गेल्यामुळे हा प्रकार वाढण्याची भीती वर्तवण्यात आलीच होती," असंही सामाजिक कार्यकर्त्या वृंदन बावनकर म्हणतात.
लोकांच्या हातून पैसा जातोच आहे, त्यामुळे असा झटपट पैसा कुठून येतो का, अशी शक्यता सगळेच पडताळून पाहत आहेत आणि गुन्हे करत आहेत, असंही त्या सांगतात.

फोटो स्रोत, Ani
पण लॉकडाऊन आणि या खुनांचा काही संबंध आहे का?
गेल्या अडीच-तीन महिन्यात लॉकडाऊनदरम्यान नागपुरात गुन्हेगारीसुद्धा बऱ्यापैकी कमी झाली होती. लोक घरांमध्ये असल्याने घरगुती हिंसाचार वाढल्याच्या बातम्या जगभरातून येत होत्याच. नागपुरातही मे महिन्यात एका व्यक्तीने त्याच्या चार वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या केल्याची बातमी आली होती.
मग लॉकडाऊन शिथिल होताच जूनच्या पहिल्या आठवड्यात या घटना अचानक का वाढल्या?
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांच्यानुसार, दोन-तीन घटना अचानक घडल्यामुळे त्या मोठ्या बातम्या झाल्या आहेत. "जसा लॉकडाऊन शिथिल झाला तसे लोक कामावर जाऊ लागले, दुकानं उघडली. अगदी तसेच हे गुन्हे घडल्याची शक्यता आहे.
"पण याचा अर्थ असा नाही शहरातली गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या दोन वर्षांची तुलना केली तर यंदा 25 टक्केच मर्डरच्या घटनांची नोंद झालीय," असं ते सांगतात.
जानेवारी ते मे या काळात नागपूर शहरात घडलेले गुन्हे
दरम्यान, तुरुंगांमध्ये कोरोना उद्रेक टाळण्यासाठी अनेक कैद्यांना काही काळासाठी तात्काळ सोडण्यात यावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर सुमारे साडेपाचशे कैदी तुरुंगातून शहरात आल्यानेही काही प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येतय.
3 जूनला ठार झालेला अनुज ठाकूर बघेल हा कुख्यात गुंड काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तर आणखी दोन गुन्ह्यांमध्ये तुरुंगातून सुटून आलेले गुन्हेगार थेट सहभागी होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त भरणे यांनी दिली. पण त्याव्यतिरिक्त इतर घटनांमध्ये sudden provocation, तात्कालिक कारणच पुढे आल्याचं भरणे सांगतात.
'कोरोना बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण'
ताज्या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे लोकांनी लॉकडाऊनच्या काळात वाट पाहून, मग निर्बंध शिथील होताच केले असतील, अशीही शक्यता नागपूर पोलीस वर्तवतात. मात्र शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखतानाच कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना पोलिसांवर ताण वाढल्याचंही दिसून येतंय.
पोलिसांच्या ऊर्जा जी एरवी कायदा सुव्यवस्था राखण्यात खर्च होत होती, ती आता कंटेनमेंट झोन आणि विलगीकरण कक्षांमध्ये खर्च होते आहे. "आपली रोजची कामं करत असतानाच, आता कोरोना व्हायरसच्या बंदोबस्तासाठी, कुठे कंटेनमेंट झोनमध्ये तर कुठे क्वारंटाईन सेंटरमध्ये, कुठे नाकाबंदी अशा कामांमध्येच पोलिसांचा बराच वेळ चालला आहे. त्यामुळे जो वचक गुन्हेगारांवर असतो, तो कमी होण्याची शक्यता असतेच," अशी कबुली आयुक्त भरणे देतात.
याशिवाय आणखी एक कारण जे सातत्याने नागपूरच्या क्राईम डायरींमधून पुढे येत असतं, ते म्हणजे व्यभिचार आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. पत्रकार हर्डीकर सांगतात, "अनेक भागांमध्ये प्रेम प्रकरणं आणि अवैध नातेसंबंधांतून खून होण्याचा एक पॅटर्न निघून येतो."
ताज्या प्रकरणांमध्येही एक खून हा प्रेम प्रकरणातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. डिसेंबरमध्येही एका तरुणाची त्याच्या पत्नीच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना घडली होती. शहराबाहेर एका ढाब्याच्या मागे पुरण्यात आलेला त्याचा मृतदेह तब्बल दीड महिन्यांनंतर हाती लागला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























