हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचला पुत्ररत्न. ट्विटरवर शेअर केला फोटो

फोटो स्रोत, @hardikpandya7
क्रिकेटर हार्दिक पांड्या बाप झाला आहे. सर्बियन मॉडेल-अॅक्ट्रेस नताशा स्टॅनकोविच आणि त्याला मुलगा झाला आहे.
ट्विट करून हार्दिक पांड्यानं ही माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही दिवसांपूर्वच त्याने नताशा स्टॅनकोविच बरोबरच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. हार्दिकने याबाबत इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत माहिती दिली होती.
तेव्हा दुबईत एका स्पीडबोटीवर हार्दिकने नताशाला प्रपोज केलं होतं, आणि तेव्हाचे फोटो 'मैं तेरा, तु मेरी, जाने सारा हिंदुस्तान' 1.1.2020 #engaged' असं हार्दिकने म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Instagram
"नताशा आणि माझा आजवरचा प्रवास मस्त राहिला आहे, आणि आता तर यात आणखी मज्जा येणार आहे. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात एका नवीन जीवाच्या स्वागतासाठी सज्ज झालोय. या नव्या टप्प्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत, आणि तुमच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वादांची अपेक्षा आहे," असं त्याने इंस्टाग्रामवर लिहीलं होतं.
कोण आहे नताशा?
नताशा ही एक सर्बियन मॉडेल असून नच बलिये 9 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती पहिल्यांदा दिसली होती. गेल्या वर्षी 'झलक दिखला जा रिलोडेड' गाण्यातही ती दिसली होती.
बिग बॉस 8च्या वेळी पहिल्यांदा नताशा चाहत्यांना माहिती झाली होती.
हार्दिकच्या वाढदिवसाला नताशाने स्पेशल मेसेज लिहिला होता. ''माझ्या सगळ्यांत जवळच्या मित्राला- तुझं सच्चेपण भावतं. यंदाचं वर्ष तुझ्यासाठी चढउतारांचं गेलं. कटू प्रसंग तुला आणखी कणखर करतील. तू अनेकांसाठी प्रेरणादायी आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. जे घडलं त्यातून तू आणखी परिपक्व माणूस म्हणून समोर आलास'', असं नताशाने म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Instagram
दुखापतीमुळे हार्दिक क्रिकेटपासून तीन महिने दूर आहे. आशिया चषकादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा दुखापतीने ग्रासले.
पाठीच्या दुखण्यासाठी लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
26 वर्षीय हार्दिकला गेल्या वर्षी वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळता आलं नव्हतं.

फोटो स्रोत, Twitter
हार्दिक दमदार बॉलर
भागीदारी तोडण्यात वाकबगार गोलंदाज अशी ओळख हार्दिकने निर्माण केली आहे.
वनडे संघात तीन वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज अशा समीकरणासह भारतीय संघ खेळतो. पिचनुसार दोन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू असंही समीकरण केलं जातं.
पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक भारतीय संघासाठी उपयुक्त आहे. दहा षटकांमध्ये धावा रोखतानाच हार्दिक खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना माघारी धाडतो.
हार्दिक पाचवा अर्थात कामचलाऊ गोलंदाज आहे या पवित्र्यात असलेले प्रतिस्पर्धी फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर धोका पत्करतात आणि बाद होतात.
धावा रोखणं आणि सातत्याने विकेट्स पटकावणं अशा दोन्ही आघाड्या हार्दिक उत्तम सांभाळतो.

फोटो स्रोत, Getty Images
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत टोलेबाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणं अवघड असतं.
कारण प्रथम फलंदाजी असेल तर मोठी धावसंख्येची मजल मारण्याचं आव्हान असतं आणि धावांचा पाठलाग असेल तर वाढणाऱ्या रनरेटचं दडपण असतं.
अशावेळी रनिंग बिटविन द विकेट्स उत्तम असेल आणि दमदार स्ट्राईक रेटसह धावा करू शकेल असा बॅट्समन आवश्यक असतो. हार्दिकने या रोलसाठी स्वत:ला तयार केलं आहे.
याव्यतिरिक्त हार्दिक चपळ क्षेत्ररक्षक आहे.
बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर एक पॅकेज म्हणून हार्दिक भारतीय संघाच्या योजनांचा महत्वाचा भाग आहे.
2016 मध्ये वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने आतापर्यंत 42 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेतलं त्याचं बॅटिंग अॅव्हरेज 29.13 इतकाच आहे पण स्ट्राईकरेट शंभरपल्याडचा आहे.
सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी स्ट्राईकरेट महत्त्वाचा असतो. वनडेत हार्दिकच्या नावावर 40 विकेट्स आहेत. 5.55ची इकॉनॉमी काटकसरी नक्कीच नाही, पण हुकमी विकेट्स काढण्याच्या बाबतीत हार्दिक पटाईत आहे.
मोठ्या स्पर्धांचं, मोठ्या संघांचं तसंच अव्वल प्रतिस्पर्धी खेळाडूंचं हार्दिकवर दडपण नसतं. हार्दिक नेहमीच त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ करतो.
कॉफी आणि बरंच काही
कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोघांवर बंदी घालण्यात आली. बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत होता. बंदीच्या निर्णयामुळे हार्दिकला मायदेशी पाठवण्यात आलं.
या कालावधीत हार्दिकने आपल्या उद्गारांसाठी चाहत्यांची माफी मागितली. "कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, कार्यक्रम हलक्याफुलक्या स्वरूपाचा होता. भावनेच्या भरात मी बोलून गेलो," असं हार्दिकने सांगितलं.
बंदी उठवली मात्र कारवाई बाकी
बीसीसीआयच्या COA अर्थात प्रशासकीय समितीने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी ओमबड्समनची नियुक्ती झालेली नसल्याने हर्दिक आणि के एल राहुल या दोघांवरील बंदी उठवली.
अमायकस क्युरी अर्थात न्यायालयाचे मित्र पी. व्ही. नरसिंहा यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय समितीने बंदी हटवण्याचा निर्णय घेतला.
मात्र ओमबड्समनच्या नियुक्तीनंतर याप्रकरणाची सुनावणी होईल आणि कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. बंदी उठवण्यात आल्याने लोकेश राहुलची भारतीय अ संघात निवड करण्यात आली तर हार्दिक न्यूझीलंडला रवाना झाला.
राहुल तिरुवनंतपुरममध्ये भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळला.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
























