'अर्णब' चक्रीवादळामुळे भीषण वादळ आणि पाऊस; अनेक भागांना मोठा फटका

28 ऑक्टोबर 2026 रोजी अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली.
फोटो कॅप्शन, 28 ऑक्टोबर 2026 रोजी अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

हवामान विभागानं सांगितलं आहे की, 'अर्णब' नावाचं 'अत्यंत भीषण' असं चक्रीवादळ बुधवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याच्या प्रक्रियेतच होतं.

या वादळाचं केंद्र किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे.

हवामान विभागानं सांगितलंय की, चक्रीवादळाच्या उत्तरेकडील भागातील ढगांचा आणि पावसाचा वक्र पट्टा आता जमिनीवर आणखी पुढे सरकला आहे. चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया पुढील तीन तास सुरू राहण्याची शक्यता आहे.

"अर्णब या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचं केंद्र आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ असून ते किनारपट्टीवर धडकण्याच्या प्रक्रियेत आहे," असं हवामान विभागानं एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुदुचेरीमधील यानमच्या दक्षिणेला, बापटला आणि विशाखापट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकलं. त्यावेळी ते एक तीव्र चक्रीवादळ होतं आणि वाऱ्याचा कमाल वेग ताशी 125-135 किलोमीटर होता.

वाऱ्याचे झोत ताशी 150 किलोमीटर वेगानं वाहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:20 च्या सुमारास वादळ किनारपट्टीवर धडकलं.

'अर्णब' चक्रीवादळ

विमानांवर परिणाम

अर्णब चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील चेन्नई आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागातील एनोर द्रुतगती मार्ग आणि इतर किनारपट्टीच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळामुळे उंच लाटा जमिनीवर पोहोचताना दिसल्या.

विजयवाडा आणि विशाखापट्टणममधील विमान कंपन्यांनी किमान 21 उड्डाणं रद्द केली आहेत. मंगळवारी विजयवाडा विमानतळावरून हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, विशाखापट्टणम आणि कडप्पा इथं जाणारी पाच उड्डाणं रद्द करण्यात आली. विजयवाडा विमानतळ प्रशासनानं बुधवारची सर्व उड्डाणेही रद्द केली आहेत.

चंद्रबाबू नायडू काय म्हणाले?

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी सांगितलं की, अर्णब चक्रीवादळामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी टळली, असंही त्यांनी म्हटलं.

जिल्हाधिकाऱ्यांसह 32 हजार कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या टेलिकॉन्फरन्स दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चक्रीवादळग्रस्त भागांमध्ये मालमत्तेचं नुकसान कमीत कमी करून लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

'अर्णब' चक्रीवादळ

"अर्णब चक्रीवादळामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. प्रशासकीय यंत्रणेनं आगाऊ घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे जीवितहानी टाळण्यास मदत झाली," असं नायडू यांनी एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

अर्णब किनारपट्टीजवळ पोहोचताच, आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दक्षिण ओडिशामध्ये चिंतेचं वातावरण कायम होतं.

विशाखापट्टणममध्ये शेकडो झाडं उन्मळून पडली आहेत. बृहत्तर विशाखापट्टणम महानगरपालिकेनं मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत यापैकी 55 झाडं हटवली होती. रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी झाडं हटवणारी तीस पथकं कार्यरत आहेत.

महापालिका आयुक्त केतन गर्ग यांनी गाजुवाकाकडे जाताना पूर्व आणि दक्षिण विभागांच्या काही भागांची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी उपस्थित राहून पडलेली झाडं आणि ढिगारा तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना रात्रभर काम करण्यास सांगण्यात आलं आहे.

झाडं कोसळली, पुरासारखी परिस्थिती

अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की, यानममधील मदत शिबिरांमध्ये आतापर्यंत केवळ 2 हजार लोक पोहोचले आहेत. वारंवार इशारा देऊनही, बहुतेक लोक आपली घरं सोडण्यास तयार नाहीत. पुदुचेरीच्या या भागात, जिथं चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, तिथं सुमारे 5 हजार लोकांसाठी 20 मदत शिबिरं उभारण्यात आली आहेत.

यानमचे प्रादेशिक प्रशासक शिवराज मीना यांनी 'द हिंदू'ला सांगितलं की, "बहुसंख्य लोक मदत शिबिरांमध्ये जाण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांची समजूत घालण्यासाठी आम्हाला एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांना तैनात करावं लागत आहे."

55,600 हून अधिक लोकसंख्या असलेल्या यानम शहरात सुमारे 100 एनडीआरएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. नुकसान कमी करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला असलेली झाडंही छाटण्यात आली आहेत.

'अर्णब' चक्रीवादळ
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मुसळधार पाऊस आणि समुद्राचं पाणी शिरल्यामुळे काकीनाडा जिल्ह्यातील बॉम्बे कट्टा परिसराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांची पोलिसांनी सुटका करण्यात आली. ही माहिती जिल्हा पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

हे चार जण सकाळी कर्तव्यावर हजर झाले होते, पण रात्र होईपर्यंत अडकून पडले होते. पुराच्या पाण्याने त्यांचं निवासस्थान पूर्णपणे वेढलेलं होतं. त्यामुळे त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. त्यांनी पोलिसांना आपल्या परिस्थितीबद्दल माहिती दिली, त्यामुळे बचावकार्य सुरू झालं.

प्रसिद्धीपत्रकानुसार, पोलिसांनी त्या चारही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, त्यांना एका वाहनात बसवलं आणि घरी पाठवलं.

दरम्यान, अर्णब चक्रीवादळामुळे काकीनाडा अँकरेज बंदरातील सीडब्ल्यूसीच्या गोदामांमध्ये तीन जण अडकल्याचं वृत्त आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या पाण्यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. इतकंच नाही, तर वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता.

जेव्हा रात्रपाळीतील कामगारांना गोदामाच्या आवारातून बाहेर पडता येत नव्हतं, तेव्हा परिस्थिती गंभीर झाली. पुराच्या पाण्यानं संपूर्ण परिसर व्यापला होता.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावं, असा सल्ला पोलिसांनी लोकांना दिला आहे.

या चक्रीवादळाला अर्णब हे नाव कसं मिळालं?

हे चक्रीवादळ त्याच्या 'अर्णब' या नावामुळेही चर्चेत आहे. नामकरण प्रक्रिया आणि त्यामागील कारण लक्ष वेधून घेत आहे.

चक्रीवादळाचं नाव बांगलादेशनं सुचवलेलं होतं. हा एक बंगाली शब्द असून त्याचा अर्थ 'महासागर' किंवा 'समुद्र' असा होतो. उत्तर हिंद महासागरातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नाव देण्याच्या पद्धतीचा हा एक भाग आहे.

'अर्णब' चक्रीवादळ

उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावांच्या यादीत 52 नावांचा समावेश आहे. ही नावं बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांनी दिली आहेत. ही यादी एप्रिल 2020 मध्ये स्वीकारण्यात आली.

बंगालचा उपसागर हा जगातील प्रमुख प्रदेशांपैकी एक आहे, जिथं उष्णकटिबंधीय चक्रीवादळं येतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)